इंदापूर : प्रतिनिधी
कोणत्या निवडणुका लढवायच्या, कुणी लढवायच्या याबाबत पक्ष नेतृत्वाकडून निर्णय होत असतो. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षाकडून आदेश झालेच तर त्याबद्दल विचार करू असे स्पष्टीकरण माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवतील, अशी चर्चा आहे. याबद्दल आज झालेल्या पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील यांना विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी अद्यापपर्यंत अशी चर्चा झालेली नसल्याचे सांगितले.
कोणत्याही निवडणुका लढवण्याबाबत पक्ष नेतृत्वाकडून निर्णय होत असतात. त्यामुळे बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्ष नेतृत्वाकडून आदेश झाले तर त्याबद्दल निश्चितच विचार करू असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले. केंद्रीय सहकार राज्यमंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी यावेळी उत्तर दिले. सातत्याने वेगवेगळ्या चर्चा होत असतात, मात्र त्या माझ्यापर्यंत तरी पोहोचलेल्या नाहीत असे म्हणत त्यांनी या चर्चांना विराम दिला.