नागपूर : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधीमंडळात जोरदार फटकेबाजी करत सत्ताधारी नेत्यांना कानपिचक्या दिल्या. याचदरम्यान बोलताना त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना इशारा दिला आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत येवून घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करू अशा वल्गना करून गेले. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच कार्यक्रम होईल असा थेट इशाराच अजितदादांनी दिला आहे.
सप्टेंबर महिन्यात भाजपचं सरकार आल्यानंतर भाजपचे एक नेते बारामतीत आले. बारामतीत घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना केल्या. आता बारामतीत आमचं काम आहे, तिथे खरेच करेक्ट कार्यक्रम होणार आहे का ? असा सवाल करत अजित पवार म्हणाले, मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच कार्यक्रम होईल.
संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की मी कुणाला चॅलेंज दिलं तर कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात तसं मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. त्यांना म्हणावं जरा दमानं घ्या.. गाडी फारच फास्ट चालली आहे.. गाडी वेगात गेली तर अपघात होईल अशा शब्दांत अजितदादांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव न घेता सुनावलं.
दरम्यान, विधानसभेतील भाषणादरम्यान आज अजितदादांनी तूफान फटकेबाजी केली. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्यासह शिंदे गटातील नेत्यांनाही त्यांनी आपल्या खास शैलीत टोले लगावले.