
सातारा : प्रतिनिधी
मी अनेकदा सांगतो की मला राष्ट्रीय राजकारणात रस नाही. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आहे. असं असताना कालच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील निवडींवरून काहीही बातम्या चालवल्या असं सांगत अलीकडील काळात मिडिया माझ्या प्रेमात का पडलाय हेच कळेना झालंय अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
काल राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वर्धापनदिनी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या माध्यमात चालवण्यात आल्या. आज सातारा दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी या सर्व बातम्यांचं खंडन केलं. अलीकडे मिडिया माझ्या प्रेमात का पडलाय हेच कळत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी अजित पवार यांनी दिल्लीतील संपूर्ण घटनाक्रम सांगत नाराजीच्या बातम्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, मला काल दिल्लीतील बैठक बारा वाजता होणार असल्याचं कळवण्यात आलं होतं. ही बैठक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची होती. त्यामुळं मी बैठकीपूर्वी दाखल झालो. त्यानंतर वेगवेगळी भाषणे, नवनिर्वाचित आमदारांचे सत्कार आणि अध्यक्षीय भाषण असे कार्यक्रम पार पडले. हे सर्व कार्यक्रम होईपर्यंत दुपारचे दोन वाजले.
मला पुण्यासाठी ४ वाजता विमान असल्यामुळे मी तातडीने तिथून विमानतळावर गेलो. मात्र तिथे विमान उशीरा येणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर मी पुण्यात पोहोचल्यानंतर माध्यमात चालवल्या जाणाऱ्या बातम्यांबद्दल मला माहिती मिळाली. त्यामुळे मी विमानतळाबाहेर येताच माध्यमांशी संवाद साधत नाराजीचा विषयच येत नसल्याचे स्पष्ट केले.
मी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळत आहे. जाणीवपूर्वक अशा पद्धतीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. आता नेमकं काय झालं हेच सांगण्यात माझा वेळ जात असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेता म्हणून विविध कार्यक्रमांना हजेरी लावणं, सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन काम करणं हे सर्व काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
वास्तविक मला केंद्रातील राजकारणात अजिबात रस नाही. १९९१ साली बारामतीकरांनी मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं. पण सहा महीने तिथले चित्र पाहिल्यानंतर मी पुन्हा महाराष्ट्रात आलो. माझ्या कामाची पद्धत आणि राष्ट्रीय राजकारणातील कामाची पद्धत यात प्रचंड फरक आहे. त्यामुळे दिल्लीच्या अनुभवानंतर मी महाराष्ट्रातच कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मी राज्यातच कार्यरत असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.