बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी आज निवडणुक होत आहे. आज सकाळी ११ वाजता पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळ बैठकीत ही निवड होणार आहे. संचालकपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कार्यबाहुल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त जागेसाठी आज निवडणुक होत आहे. सकाळी ११ वाजता ही निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. संचालक निवडीचे संपूर्ण अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहेत. त्यामुळे अजितदादा कुणाला संधी देतात याकडे लक्ष लागले आहे.
अजितदादांनी पुणे जिल्हा बॅंकेतूनच जिल्ह्यातील राजकीय कारकिर्द सुरु केली आहे. त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांना संधी मिळेल अशी चर्चा आहे. दुसरीकडे जिल्हा बॅंकेत बारामतीतीलच व्यक्ती असेल असंही अजितदादांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता जिल्हा बॅंकेत कोणाची वर्णी लागते हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.