Site icon Aapli Baramati News

POLITICAL BREAKING : एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांची मोठी खेळी; महादेव जानकर यांनी केलं महायुतीवर शिक्कामोर्तब..!

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. कालपर्यंत महाविकास आघाडीत दाखल होण्यावर ठाम असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महाविकास आघाडीत दाखल होऊन माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जानकर यांनी चर्चा करत महाविकास आघाडीसोबत येण्याची तयारी दर्शवली होती. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह महादेव जानकर यांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर महादेव जानकर यांनी महायुतीतच राहणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असून त्यांच्याच नेतृत्वात भारत देश विकसित राष्ट्र म्हणून पुढे येईल. त्यामुळे आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत राहणार असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महादेव जानकर यांना महायुतीकडून लोकसभेची एक जागा दिली जाणार आहे. महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनिशी सोबत राहणार असल्याचं महादेव जानकर यांनी जाहीर केलं. लोकसभा निवडणुकीच्या रणधूमाळीत महादेव जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version