
मुंबई : प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान, विधान परिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. गोपीचंद पडळकर यांनी थेट निलम गोऱ्हे यांना उलट उत्तर देत त्यांच्यावर आरोप केल्यामुळे सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. निलम गोऱ्हे यांनी पडळकर यांचा माईक बंद करत त्यांना एक दिवस बोलू न देण्याची शिक्षा दिली. त्याचवेळी तुम्ही पीठासनाचा अवमान केला आहे, त्यामुळे तुम्हाला मार्शल बोलावून बाहेर काढावे लागेल, असंही इशारा गोऱ्हे यांनी दिला.
विधानपरिषदेत काल आमदार गोपीचंद पडळकर हे विविध मुद्यांवर बोलत होते. त्यांची वेळ संपल्याचं लक्षात आल्यानंतर उपसभापती निलम गोऱ्हे यांनी त्यांना आवरतं घ्या, तुमची १३ मिनिटं झाली आहेत. त्यावर पडळकर यांनी माझे विषय महत्वाचे आहेत, तुम्ही इतरांना वेळ देता आणि आमचं गणित बिघडवून टाकता असं म्हटलं. यावर तुमचं गणित बिघडलंय, ते थांबवा आता असं प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा पडळकर यांनी बोलायला सुरूवात केल्यानंतर निलम गोऱ्हे यांनी दोन मिनिटांत विषय संपवा अशी सूचना केली.
माझे महत्वाचे विषय आहेत, मला काही विषय मांडायचे असल्याचं पडळकर यांनी सांगितलं. तुम्ही वेळेचं भान ठेवा, आता साडेआठ वाजलेत, सभागृहाला वेठीस धरू नका असं निलम गोऱ्हे यांनी पुन्हा सांगितलं. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी मी कुणालाही वेठीस धरत नसल्याचं सांगत, तुम्ही नीट नियोजन न करता विनाकारण वाद घालता असा थेट आरोप केला. निलम गोऱ्हे यांनी पडळकर यांना बोलताना मर्यादा पाळण्याची सूचना केली. तरीही पडळकर यांनी तुम्ही नीट नियोजन करा ना, एकेकाळा एक-एक, दीड-दीड तास देता, एकाला २५ मिनिटं.. आम्ही बोलायला लागलो की बेल वाजवत बसता असं म्हटलं.
पडळकर यांच्या या विधानानंतर निलम गोऱ्हे अक्षरश: संतापल्या. त्यांनी थेट पडळकर यांचा माईक बंद करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. त्यावर गोपीचंद पडळकर यांनी तुमचा निषेध करतो असं म्हणत आपल्या जागेवर बसणं पसंत केलं. त्यानंतरही निलम गोऱ्हे आणि गोपीचंद पडळकर यांच्या शाब्दिक खटके उडाले. या दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मध्यस्थी करत तुम्ही एक मिनिट वेळ वाढवून मागा आणि विषय संपवा असं सुचवलं. या सर्व प्रकारानंतर पुन्हा गोपीचंद पडळकर यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यांचा वेळ संपल्यामुळे निलम गोऱ्हे यांनी त्यांना पुन्हा थांबवले. त्यावर पडळकर यांनी आभार मानत आपले मुद्दे संपवले.
या सर्व प्रकारानंतर आमदार सचिन अहिर यांनी पडळकर यांचं बोलणं संसदीय संकेतांना धरून नसल्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं मत व्यक्त केलं. मी कशासाठी दिलगिरी व्यक्त करू, सभापती महोदयांनीच विचार केला पाहिजे असं प्रत्युत्तर गोपीचंद पडळकर यांनी सचिन अहिर यांना दिलं. शेवटी निलम गोऱ्हे या आपल्या आसनावरून उभ्या राहिल्या आणि त्यांनी तुम्ही माझा निषेध केला आहे, ही बाब मी सभागृहातील कामकाजातून काढून टाकत असल्याचं सांगितलं.
तुम्ही आज जे वर्तन केलं आहे, त्यामुळे मी उद्या तुम्हाला दिवसभर सभागृहात बोलू न देण्याचा निर्णय घेतला आहे. तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. तुम्हाला जे बोलायचं ते बोला. मात्र तुम्ही पीठासनाचा अवमान केला आहे. तो फक्त माझा अवमान नसून संभागृहांचा अवमान आहे, याची तुम्हाला जाणीव नाही. त्यामुळे आता तुम्हाला बोलण्याची संधी मिळणार नाही. अन्यथा मार्शलला बोलावून तुम्हाला सभागृहाबाहेर काढावं लागेल.