
इंदापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांच्यावर भाजपकडून महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी संधी देत युवा संघटन बळकट करण्याची जबाबदारी अंकीता पाटील ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
अंकिता पाटील-ठाकरे यांनी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद मतदार संघातून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. या निवडणुकीत त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले होते. जिल्हा परिषदेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. सध्या त्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये अंकिता पाटील-ठाकरे या कार्यरत आहेत.
महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अग्रस्थानी असतात. भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी अंकिता पाटील-ठाकरे यांची ही निवड जाहीर केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करत पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची ग्वाही अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.