Site icon Aapli Baramati News

POLITICAL BREAKING : अन अजितदादा म्हणाले… अरे बाप रे.. मग तर मी मरून जाईन; कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहावी लागेल…!

ह्याचा प्रसार करा

पिंपरी चिंचवड : प्रतिनिधी

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४४० व्होल्टचा करंट देण्याच्या वक्तव्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. एवढा जर करंट बसला तर मी मरुनच जाईल. कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहावी लागेल अशा शब्दात अजितदादांनी बावनकुळेंच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. एवढ्यावरच न थांबता तुम्ही एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात, बोलताना जरा तारतम्य बाळगा आणि मानसिक संतुलन बिघडू देऊ नका असा सल्लाही बावनकुळे यांना दिला आहे.

चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचारादरम्यान अजित पवार यांना चिंचवडच्या जनतेने ४४० व्होल्टचा झटका द्यावा असे वक्तव्य केले होते. आज चिंचवड परिसरात प्रचारसभेनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आपल्या खास स्टाईलमध्ये बावनकुळे यांना कानपिचक्या दिल्या.

पत्रकारांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याबद्दल विचारणा केल्यानंतर अजित पवार म्हणाले, अरे बाप रे, ४४० चा करंट म्हणजे मी मरून जाणार.एवढा मोठा करंट बसल्यावर मी कसा जगू शकतो. अरे रे रे.. आता माझ्या मतदारांना, कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहावी लागेल की काय कुणास ठाऊक..! त्या चंद्रशेखर बावनकुळेंना सांगा,आपण एका सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आहात. उगीच बोलायची संधी मिळाली म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला.. जरा काहीतरी तारतम्य ठेवा.. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका..

अजित पवार हे नेहमीच आपल्या स्टाईलमध्ये विरोधकांचा समाचार घेत असतात. आजही चिंचवडमध्ये अजितदादांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्याचवेळी मानसिक संतुलन बिघडू न देण्याचा सल्लाही दिला आहे. त्यामुळे अजितदादांच्या या प्रत्युत्तराची चांगलीच चर्चा रंगली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version