आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

POLITICAL BREAKING : मुंबईत अजितदादांचं जोरदार शक्ती प्रदर्शन; मला आशीर्वाद द्या, जीवात जीव असेपर्यंत कार्यकर्त्यांना अंतर देणार नाही : अजितदादांनी दिली ग्वाही

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

आजपर्यंत कार्यकर्त्यांनी मला खूप प्रेम दिलं असून वेळोवेळी साथ दिली आहे. त्यामुळे माझ्या जीवात जीव असेपर्यंत तुम्हाला अंतर देणार नाही अशी ग्वाही देतानाच यापुढील काळात राज्यभर फिरून आपली भूमिका मांडणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. आगामी निवडणुकांमध्ये नव्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं असून राष्ट्रवादीची मजबूत फळी निर्माण करायची असल्याचा मनोदयही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

आज मुंबईतील एमईटीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रिफ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे यांच्यासह आमदार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मी आजवर अनेकदा उपमुख्यमंत्री झालो आहे. माझे तर आता रेकॉर्ड झाले आहे. मात्र या पदाच्या पुढे काही जात नाही असे सांगत अजित पवार म्हणाले, मागच्या काळात पक्षाच्या नेत्यांनी काही धोरणे स्वीकारली. त्यामुळे राष्ट्रवादीचा आजवर मुख्यमंत्री झाला नाही. मागेच जर योग्य धोरण स्वीकारले असते तर आजवर राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री असता. मात्र आता आपण नव्याने पक्ष बांधणी करून राज्यभर फिरू, आगामी निवडणुकीत सर्वाधिक आमदार निवडून आणू असेही अजित पवार यांनी सांगितले.

आगामी काळात नव्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची आहे. हे केवळ भाषणात सांगून नाही तर कृतीत आणून काम करायचे आहे. यात अजित पवार कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्या. त्या आशीर्वादाला मी निश्चित जागेन असेही भावनिक आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.

आम्ही जे करतोय ते राज्याच्या भल्यासाठी करतोय. अनेक आमदारांची कामे प्रलंबित आहेत, ती मार्गी लावली जातील. तसेच कोणत्याही आमदाराला निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. येत्या मंत्रीमंडळ विस्तारात आपल्याला आणखी संधी मिळणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या महामंडळांवरही संधी मिळणार आहे. त्यामुळे अधिकाधिक कार्यकर्त्यांना संधी देता येणार असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us