बारामती : प्रतिनिधी
दिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब नेहमीप्रमाणे एकत्र आलं असून दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर आले. जेव्हा आपलं वय वाढतं तेव्हा वैचारीक प्रगल्भताही वाढली पाहिजे. नाती एका जागेवर आहेत आणि राजकीय भूमिका एका जागी. आमची लढाई वैचारीक आहे, वैयक्तिक नाही अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमातील चर्चांना उत्तर दिलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी गोविंद बाग येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवार कुटुंबियांच्या एकत्र दिवाळीवर भाष्य केलं. राजकीय भूमिका वेगळी असली तरी आमची नाती वेगळी आहेत. यामध्ये मनभेद नाहीत. तसेच ही व्यक्तीगत लढाई नाही. आज देशात भाजपातील अनेक कुटुंबांशी आमचे चार-पाच दशकांचे ऋणानुबंध आहेत. आमचे राजकीय मतभेद आहेत, परंतु कोणत्याच कुटुंबाशी मनभेद अजिबात नाहीत असं त्या म्हणाल्या.
जेव्हा आपलं वय वाढतं तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई वैचारीक आहे, वैयक्तिक नाही असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितलं. शरद पवार यांना काल बरं वाटत नव्हतं, आता बरं वाटत आहे. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद आणि जनता ही त्यांचं टॉनिक आहे. त्यामुळे त्यांनी पूर्ववत भेटी सुरू केल्या असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिली.
अजितदादांचं गिफ्ट अजून मिळालं नाही
दादांशी काय बोलणं झालं किंवा दिवाळीचं गिफ्ट मिळालं का याबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे यांनी दिलखुलास उत्तर दिलं. आता ते मला कसं कळणार, ते तर तुम्हाला दादालाच विचारावं लागेल. अजून तर मला गिफ्ट मिळालं नाही असं त्या म्हणाल्या. अजितदादा नुकतेच डेंग्युतून बरे झाले आहेत. त्यामुळे ते काळही मास्क लावून कार्यक्रमाला हजर होते. त्यामुळे दिवाळी पाडव्याच्या कार्यक्रमाला डॉक्टर काय सल्ला देतात, त्यानुसार ते निर्णय घेतील, असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.