
मुंबई : प्रतिनिधी
महापालिका आयुक्तांवर शाई फेक केल्याप्रकरणी आमदार रवी राणा यांच्यावर ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अधिवेशनात चांगलेच गाजले आहे. याप्रकरणी विधानसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रवी राणा यांना बोलण्याची संधी मिळाल्यानंतर, मी बोलत असेल तर, मला फाशी द्या. अन्यथा मी फाशी घेईल, अशा संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
रवी राणा म्हणाले, छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा पुतळा पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांच्या संमतीने छनी-हातोड्याने तोडला गेला. त्यांचा पुतळा गोडाऊनमध्ये टाकण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या. यातूनच शिवप्रेमींनीकडून आयुक्तांवर शाई फेकली गेली, त्याचा मी निषेध करतो. मात्र मी दिल्लीमध्ये असताना देखील माझ्यावर ३०७ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
नेत्यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास माझ्या घरात १५० ते २०० पोलीस घुसवून कुटुंबीयांना त्रास देण्यात आला. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे फोन आयुक्तांना गेले असल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. सध्या राज्याला आर. आर पाटील यांच्यासारखे गृहमंत्री हवे आहेत. जर सचिन वाझे यांच्यासारखे अधिकारी राज्य निर्माण करीत असतील तर त्यांचा अनिल देशमुख झाल्याशिवाय राहणार नाही. दबावाखाली माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. राणा ज्या ठिकाणी असेल तेथे गोळी मारून ठार करा, असे पोलिसांना सांगण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.