मुंबई : प्रतिनिधी
आत्ता अनिल परबचाही नंबर लागणार.. अनधिकृत बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा.. चौकशी होणार.. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. ३० मार्च रोजी सुनावणी होणार, असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडे तक्रार देत आहेत. विशेष म्हणजे मंत्रीमंडळातील अनेक मंत्री जेलमध्ये जाणार असे भाकीत त्यांच्याकडून वारंवार करण्यात आले आहे. अशातच त्यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दल ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे.
मुरुडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात असलेल्या अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे बंगला आणि रिसॉर्ट बांधला आहे. त्याची चौकशी सुरु आहे. त्यावर येत्या काही दिवसांत कारवाई होणार आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
त्यानंतर त्यांनी आज आता अनिल परब यांचानंबर लागणार आहे असे ट्विट केले आहे. ‘आत्ता अनिल परब चा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकाम साठी आलेला पैसा….चौकशी होणार. भारत सरकारने दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे, ३० मार्च रोजी सुनावणी होणार’ असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.