मुंबई : प्रतिनिधी
देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आनंदमय वातावरणात हा सण साजरा होत असतानाच राजकीय कुटुंबही यात मागे नाहीत. आज मुंबईत राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार आणि त्यांच्या भगिनी रेवती सुळे यांनीही रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
सातत्याने धकाधकीच्या जीवनात राजकीय नेत्यांना कुटुंबासमवेत क्वचितच वेळ घालवता येतो. मात्र सण, उत्सवाच्या निमित्तानं एकत्र येऊन आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला जातो. राजकारणात प्रचंड दबदबा असलेल्या पवार कुटुंबाबद्दल साहजिकच सर्वांना आकर्षण असतं. त्यामुळेच दिवाळीत हजारो लोक पवार कुटुंबीयांना भेटण्यासाठी बारामतीत गर्दी करता असतात.
आजही पवार कुटुंबीयांनी मुंबईत रक्षाबंधनाचा सण साजरा केला. युवा नेते पार्थ पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती यांनी औक्षण करून राखी बांधली. प्रचंड धावपळ असतानाही त्यातून वेळ काढत बहीण-भावाच्या नात्याची विण घट्ट करणारा हा सण पवार कुटुंबीयांनी उत्साहात साजरा केला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जय पवार, विजय सुळे यांनी एकत्रितपणे रक्षाबंधनाचा सण साजरा केला.