Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : राष्ट्रवादी काँग्रेस अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आक्रमक; राज्यपालांची भेट घेऊन केली राजीनाम्याची मागणी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना अपशब्द वापरले. त्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप कोळसे पाटील, माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रस्टो, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवती अध्यक्ष आदिती नलावडे, मुंबई अल्पसंख्यांक अध्यक्ष सोहेल सुभेदार आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांचा समावेश होता.

राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भगतसिंग कोश्यारी यांना भेटून पत्र दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथली माती इथली संस्कृती आणि परंपरा ही आईंसमान समजली जाते. स्त्रित्वाचा आदर करून स्त्री सन्मानाचा पुरस्कार करणारा महाराष्ट्र म्हणून आपल्या राज्याची ओळख आहे. राजमाता जिजाऊ, सावित्रीदेवी फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि माता रमाईच्या लेकीचा महाराष्ट्र म्हणून अभिमानाने गौरविला जातो. परंतु या आदर्शवत स्त्रियांच्या संस्कारांना काळिमा फासण्याचं काम आज महाराष्ट्रात झालं असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

पवित्र अशा संविधानाची शपथ घेऊन मंत्री म्हणून महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे विद्यमान कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी लोकसभा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल उच्चारलेले आक्षेपार्ह शब्द व केलेले वक्तव्य याचा आम्ही जाहीरपणे तीव्र शब्दात निषेध करतो.

एका महिलेला अशाप्रकारे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र राज्याच्या एका जबाबदारीच्या पदावर राहण्याचा कुठलाही लाक्षणिक अधिकार नाही. तेव्हा महामहिम राज्यपाल महोदय आमची विनंती आहे की, सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासून स्त्रीत्वाचा अपमान करणाऱ्या कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांना तातडीने बडतर्फ करावे. आपण महाराष्ट्राच्या लेकींना नक्की न्याय मिळवून द्याल, याची मला खात्री आहे, अशा आशावाद राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने राज्यपालांना भेटून पत्र देत व्यक्त केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version