Site icon Aapli Baramati News

नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला; ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

ईडीच्या अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने दणका दिला आहे. नवाब मलिक यांनी दाखल केलेला जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मलिक यांच्या प्रकृतीमुळे चौकशी पूर्ण झाली नसल्याने त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांना ईडीकडून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. त्याच दरम्यान पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

प्रकृती अस्वस्थ झाल्याने  नवाब मलिक यांच्या चौकशीसाठी केवळ चारच दिवस मिळाले आहेत. नवाब मलिक यांच्या पहिल्या रिमांड अर्जामध्ये आम्ही गुन्हेगारी क्षेत्राशी निगडित असलेले अनेक आर्थिक व्यवहार  दाखवले होते. हसीना पारकर यांचा जवाब,फसवणूक झालेल्या मुनिराचा जबाब आदींच्या पार्श्वभूमीवर चौकशीसाठी आणखी सहा दिवस हवे आहेत असा युक्तिवाद ईडीचे वकील अॅड. अनिल सिंग यांनी केला.

नवाब मलिक यांच्या वतीने अॅड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांच्या कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ केली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version