Site icon Aapli Baramati News

‘या’ कारणामुळे नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही : जयंत पाटील

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ईडीच्या अटकेत आहेत. विरोधी पक्ष भाजपाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू झाल्यापासून दररोज त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी संधी मिळालेली नाही.त्यामुळे  नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही,असे  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत.  ते केवळ जेलमध्ये असल्याने त्यांचे पद काढून घेणे योग्य नाही.  अनिल देशमुख यांनी स्वत:हून राजीनामा दिला होता. आतापर्यंत त्यांच्या घरावर ९५ वेळा छापे टाकण्यात आले आहेत. मात्र हे सगळे जाणीवपूर्वक चाललेले आहे, ही आम्हा सर्वांची धारणा झालेली आहे.

नवाब मलिक यांना स्पष्टीकरण देण्यासाठी संधी मिळालेली नाही. त्यांना संधी मिळाली असती तर त्यांनी  याबाबत स्पष्टीकरण दिले असते. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी संधी मिळायला हवी होती. मात्र असे झालेले नाही. त्यामुळेच  नवाब मलिक यांचा राजीनामा घेणे योग्य नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version