पुणे : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या ईडीच्या अटकेवरून विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधकांकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यावेळी त्यांचा राजीनामा घेतला का? असा सवाल उपस्थित केला आहे.
शरद पवार यांनी पुण्यात आज पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. शरद पवार म्हणाले, गेली २० वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक काम करत आहेत. या काळामध्ये कधी असे चित्र दिसले नाही. हे आत्ताच दिसत आहे. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असेल तर त्याचा संबंध दाऊद इब्राहिमशी जोडला जात आहे. कोणतेही कारण नसताना त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. याची आम्हाला चिंता नाही. कधी काळी असेच आरोप माझ्यावरही झाले होते. आम्ही संघर्ष करत राहू असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. परंतु माझे सिंधुदुर्गातील जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यावेळी मंत्रिमंडळातून त्यांना कमी करण्याचा निर्णय कोणी घेतला हे पाहण्यात आणि वाचनात आलेले नाही. नारायण राणे यांना वेगळा न्याय आणि नवाब मलिक यांना दूसरा न्याय असे दिसत आहे. हे सगळे राजकीय हेतूने केले जात आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. कदाचित ते याबाबत उद्या खुलासा करतील, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.