दहिसर : प्रतिनिधी
दहिसर शिवसेना नागरी सत्कार समारंभात शनिवारी ( ता.17) बोलत असताना विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना देखील लक्ष्य केले आहे. दरम्यान, ‘किती आले, किती गेले तरी शिवसेना संपलेली नाही, शिवसेना आणखी वाढली असे सांगत त्यांनी शिवसैनिकांनाही धीर दिला आहे.
उद्धव ठाकरे यांना एकटं पाडायचं, शिवसेना नाव पुसून टाकायचं. ही गद्दारी करणाऱ्या ४० शिवसेना आमदारांच्या माध्यमातून हीच खरी शिवसेना आहे, बिंबवण्याचा त्यांचा उद्देश आहे. पण असं सांगणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावंच लागेल, अशी टीका करत विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर नामुष्की
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही विनायक राऊत यांनी निशाणा साधला. फडणवीसांना दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय. शिंदेच्या हाताखाली काम करण्याची नामु्ष्की त्यांच्यावर आली आहे, अशी बोचरी टीका केली आहे. याशिवाय गद्दारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे काम मागाठाणे येथून केले जाणार आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान त्यांनी नारायण राणे, मोहित कंबोज यांच्यावरही सणसणीत टीका केली.