
मुंबई : प्रतिनिधी
मनसे नेते आणि कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी उलटे बॅनर ट्विट केले आहे. हे ट्विट करत राजू पाटील यांनी शिवसेनेचे अभिनंदन करत उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यामुळे राजू पाटील यांनी केलेल्या उलट्या बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राजू पाटील यांनी ट्विट केलेल्या बॅनरमध्ये म्हटले आहे, गेल्या महिन्यात १७ फेब्रुवारीला एमआयडीसी विभागातील रस्त्यांच्या कॅांक्रीटीकरण करण्याच्या कामाचे आधुनिक पद्धतीने उद्घाटन झाले. मी अभिनंदनाचे बॅनर पण बनवले होते पण अजून काम चालू झाले नाही. काम सुरू करून लवकरच हे बॅनर सरळ करून लावायची संधी द्यावी ही विनंती, असे राजू पाटील यांनी सुभाष देसाई आणि श्रीकांत शिंदे यांना उद्देशून म्हटले आहे.
गेल्या महिन्यात १७ तारखेला MIDC विभागातील रस्त्यांच्या कॅांक्रीटीकरण करण्याच्या कामाचे आधुनिक पद्धतीने उद्घाटन झाले. मी अभिनंदनाचे बॅनर पण बनवले होते पण अजून काम चालू झाले नाही. काम सुरू करून लवकरच हे बॅनर सरळ करून लावायची संधी द्यावी ही विनंती.@mieknathshinde @Subhash_Desai pic.twitter.com/JBgtqQ9i0j
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 17, 2022
दरम्यान, १७ फेब्रुवारीला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमआयडीसी विभागातील रस्त्यांच्या कॅांक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले होते. यावेळी व्यासपीठावर नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राजू पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यासपीठावर बोलत असताना मनसे आमदारांनी अभिनंदनाचा बॅनर लावा असा चिमटा राजू पाटील यांना काढला होता. त्यानंतर व्यासपीठावर बोलताना राजू पाटील यांनी अभिनंदनाचे बॅनर नक्की लावेल, असे सांगितले होते.