
मुंबई : प्रतिनिधी
९ मार्च रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन असतो.यंदाचा वर्धापन दिन हा मुंबईबाहेर साजरा होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र यंदाचा वर्धापन दिन पुण्यात साजरा होणार असल्याचे मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले आहे.
दरवर्षी मनसेचा वर्धापन दिन मुंबईत साजरा होतो. परंतु या वर्षी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी होणार आहे. यासाठी राज्यभरातील मनसैनिक येणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकांचे नियोजन करत आहेत. उद्या त्यांच्या हस्ते पुण्यातील दोन मनसेच्या शाखांचे उद्घाटन होणार असून ते मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमालाही उपस्थिती लावणार आहेत.