
पुणे : प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या एका पेन ड्राईव्ह बॉम्बने महाविकास आघाडी सरकार शांत झाले असून दुसरा बॉम्ब तर अजून बाकी असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
चंद्रकांत पाटील आज पुण्यात विविध कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारच्या कटाची माहिती दिल्यानंतर आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्याच धमक्यांना आम्ही अजिबात घाबरणार नाही. विरोधी पक्षांना अडकवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी उधळून लावला आहे. पेन ड्राईव्ह बॉम्बने महाविकास आघाडी सरकार शांत झाले आहे. मात्र अद्याप दुसरा बॉम्ब फुटायचा बाकी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते त्यांचे काम करत आहेत. त्यांना माहिती कोठुन मिळते हे विचारण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या माहितीवर आघाडी सरकारने बोलायला पाहिजे असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करत असून त्याचा भाजप पक्षाशी काहीही संबंध नाही. परंतु तरीही फडणवीस यांना नोटिस बजावली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयावर कोणाचा विश्वास नाही हे त्यावरून सिध्द होत आहे.