मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यात कायम वाद राहिले आहेत. पुन्हा एकदा असाच एक वाद होण्याची दाट शक्यता आहे. परंतु आता कारण आहे विधानसभेतील अध्यक्षपदाचे. अध्यक्षपदावरून महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल आमने सामने आले आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तारीख निश्चितीवरून हा वाद पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी १६ मार्च ही तारीख महाविकास आघाडी सरकारने ठरवली होती. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला आहे. तरीदेखील राज्यपालांनी या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदारांनी आज ठाकरे यांची भेट घेऊन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे राजकारण तापले असून पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा संघर्ष पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत घटनात्मक बाबी तपासून राज्यपालांची भेटीची वेळ मागतो असे आश्वासन काँग्रेस नेते आणि आमदारांना दिले आहे.