मुंबई : प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाया केल्या जात आहेत. याचे पडसाद शुक्रवारी विधिमंडळ अधिवेशनाच्या सांगतेवेळी उमटले. विधानसभेत विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मर्द असाल तर,मला तुरुंगात टाका’ असे आव्हानदिले आहे.
आरोप करणारे, ईडीला माहिती देणारे चौकशी करणारे सारे तुम्हीच आहात. त्यामुळे ईडी तुमचे घरगडी आहेत का? असा प्रश्न पडतो. धाडी टाकून कुटुंबाची बदनामी करायची हे शिखंडी राजकारण बंद करा. मर्दासारखे अंगावर या. तुमच्या बरोबर येतो. मला तुरुंगात टाका. नंतर पुरावे गोळा करा. मात्र कुटुंबियांची बदनामी थांबवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले.
नवाब मलिक पाचवेळा विधानसभेची निवडणूक जिंकले. तोपर्यंत केंद्रीय तपास यंत्रणांना नवाब मलिक हे हस्तक आहेत हे माहिती नव्हते का? यापूर्वी तुम्ही राम मंदिराच्या नावावर निवडणूक लढवली आहे. आता दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन मते मागणार आहात का ? असे प्रश्नदेखील उद्धव ठाकरे यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केले.