पुणे : प्रतिनिधी
भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी राज ठाकरे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद शरद पवार यांनी कुणाच्याही कोंबड्याने दिवस उगवला तरी माझी काही हरकत नाही, असे म्हणत मिश्किल टोला लगावला आहे.
शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भाजपाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. शरद पवार म्हणाले, उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत माझी मागणी नव्हती. केवळ निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, असे मी भाजपला सुचवलं होतं. यासंदर्भात ते सकारात्मक निर्णय घेतील, याबद्दल मला खात्री होती.
एकदा निर्णय झाल्यानंतर मी त्या निर्णयाच्या संदर्भात जास्त खोलामध्ये जात नाही. त्यामुळे या निर्णयासंदर्भात जास्त बोलण्यात काही अर्थ नाही असे सांगतानाच त्यांनी अधिकचे बोलणे टाळले. भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. याचे सगळे श्रेय राज ठाकरे यांना दिले जात आहे. यासंदर्भात शरद पवार यांना विचारले असता शरद पवार यांनी कुणाच्याही कोंबड्याने दिवस उगवला तरी माझी काही हरकत नाही, असा मिश्किल टोला लगावला.