Site icon Aapli Baramati News

अरे बाबा; इतक्या दिवस झोपा काढत होता का..? अजितदादांचा सवाल

ह्याचा प्रसार करा

अहमदनगर: प्रतिनिधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त झालेल्या मेळाव्यात प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेत मशिदीवरील असणाऱ्या भोंग्याला विरोध केला. त्याचवेळी आम्हीदेखील मशिदीसमोर डबल लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू,असे म्हटले होते.त्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यात काही जण अचानक बाहेर पडले आहेत आणि अचानकच भोंगे बंद करण्याची भाषा करत आहेत. एवढ्या दिवस झोपा काढल्या का ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

कोपरगाव येथे अजित पवार यांच्या हस्ते बसस्थानक, पोलीस ठाणे, पंचायत समितीची इमारत आणि माजी मंत्री शंकरराव काळे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आदी कामाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, मागील सरकारमध्ये भोंग्याविषयी बोलणारे कोणी नव्हते का? मात्र सध्या काही लोक अशाच गोष्टी पुढे आणण्याचे काम करत आहेत. यांच्याकडून विकासाला महत्व दिले जात नाही. त्याऐवजी वेगळी चर्चा करून समाजात वितुष्ट आणि दरी कशी निर्माण होईल, हे पहिले जात आहे.

मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात आपण गुण्यागोविंदाने राहत आहोत. एकमेकांच्या सणांचा आदर करतो. एकमेकांना शुभेच्छा देतो. हीच आपली संस्कृती आणि परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांचा हा विचार आहे. भोंग्यासारख्या गोष्टी बोलुन विकास होत नसतो. मात्र आपण विकासाला महत्व देऊ. आम्ही तिन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारसरणीचे आहोत. मात्र जनतेचे भले करण्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version