बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या कुटुंबीयांसह काटेवाडी येथील निवासस्थानी गुढी पाडव्याचा सण साजरा केला. आई आशाताई पवार, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून गुढी उभारण्यात आली.
आज सकाळी काटेवाडी येथील निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कुटुंबीयांसह गुढी पाडव्याचा सण उत्साहात आणि पारंपारीक पद्धतीने साजरा केला. विधीवत पूजा करून या ठिकाणी गुढी उभारण्यात आली. यावेळी अजितदादांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी उपस्थिती लावली.
यंदाच्या गुढीपाडवा व मराठी नववर्षारंभाच्या निमित्ताने सर्वांच्या आशा-आकांक्षा, मनातली स्वप्नं पूर्ण होवोत; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
“वसंत ऋतुच्या आगमनासोबत दारोदारी गुढी उभारुन साजरा होणारा गुढीपाडवा आणि त्यासोबत सुरु होत असलेले मराठी नववर्ष, आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, चैतन्य, उत्साह, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. सर्वांच्या मनातल्या आशा-आकांक्षा, उरी बाळगलेली सर्व स्वप्नं पूर्ण होवोत. यश, किर्ती, पराक्रमाची गुढी आकाशात उंच जावो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“यंदाचं वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. सुखी, समृद्ध, बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी, शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, संस्कृती, अशा सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राला अव्वल बनवण्यासाठी, राज्यातील प्रत्येक पात्र मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. योग्य उमेदवाराला मतदान करुन, महाराष्ट्राच्या, देशाच्या प्रगतीची गुढी अधिक उंचीवर नेण्यासाठी योगदान दिलं पाहिजे,” असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
“गुढीपाडवा हा महाराष्ट्रवासियांच्या, मराठी माणसाच्या जीवनातील महत्वाचा सण. अज्ञान, अनीती, असत्य, अंधश्रद्धेसारख्या दुष्प्रवृत्तींचा विनाश करुन सत्प्रवृत्तीची गुढी उंच उभारण्याचा आज दिवस. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेला गुढीपाडव्याचा सण सर्वजण मिळून साजरा करुया. दारोदारी गुढी उभारुया. शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदाचा गुढीपाडवा संस्मरणीय करुया. महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान कायम ठेवण्यासाठी, आपण सर्व महाराष्ट्रवासीय एकजूट होऊन, आपले योगदान देऊया…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.