मुंबई: प्रतिनिधी
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. महाविकास आघाडी आणि आमचे कसलेच संबंध नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीकडून आमदारांच्या यादीतून माझे नाव काढून टाका, असे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी मंत्रिमंडळात ठराव करून महाविकास आघाडी सरकारने १२ नावांच्या शिफारसीची यादी राज्यपालांकडे दिली आहे. मात्र गेल्या काही काळापासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा तिढा सुटलेला नाही. १२ नावांच्या शिफारसीमध्ये सामाजिक, कृषी व सहकार या विभागातील माहितीगार व अनुभवी व्यक्ती म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून राजू शेट्टी यांच्या नावाची शिफारस देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून सरकारने घटक पक्षांना कोणत्याही प्रकारे विचारात न घेता राज्यकर्त्यांच्या फायद्यासाठी शेती आणि सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर चुकीचे धोरण राबवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या शिफारशीवरून विधान परिषदेचे सदस्यत्व स्वीकारणे माझ्यासाठी नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे आमदार यादीतून माझे नाव वगळा, अशी विनंती राजू शेट्टी यांनी राज्यपालांकडे केली आहे.