मुंबई:प्रतिनिधी
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या काही अधिकाऱ्यांवर वसुलीचे आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ईडी अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटीची) स्थापना करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी काम करणार आहे. त्यासाठी सरकारकडून त्यांना हवा तितका पुरेसा वेळ देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनुसार संबधित ईडीच्या अधिकाऱ्यांचा एसआयटीकडून तपास करण्यात येणार आहे. एसआयटीकडून अधिकाऱ्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण तपासाचा प्राथमिक अहवाल गृहमंत्र्यांकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांकडे अहवाल सादर केल्यानंतर त्यांचा आदेश आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि ईडीच्या अधिकाऱ्यांवर वसुली करत असल्याचा खळबळजनक आरोप केला होता. महाराष्ट्रातील अनेक व्यावसायिकांकडून अधिकाऱ्यांनी पैसे वसूल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. आपण यासंदर्भातील पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे सादर केले आहेत. अनेक नेते आणि ईडीचे अधिकारी तुरुंगात जाणार असल्याचे संजय राऊत म्हटले होते.