
राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांची आज जयंती. धुरंदर राजकारणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वसंतदादांचा राजकीय इतिहास खूप मोठा आहे. आजही त्यांच्या अनेक आठवणी वेळोवेळी समोर येत असतात. अशीच एक आठवण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनीलकुमार मुसळे यांनी शब्दबद्ध केली आहे. ती खास आपली बारामती न्यूजच्या वाचकांसाठी..
सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यातील माझा एक मित्र क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा पास झाला होता, त्याच्या पोस्टिंगला विलंब होत होता. हा मित्र सामान्य गरीब कुटूंबातील. कमवा आणि शिकवा या योजनेतून शिक्षण पूर्ण केलेला. कमवा आणि शिका मध्ये त्याने कोल्हापूरला कृषी विद्यापीठात काम केले होते. तो कृषी खात्यात कनिष्ठ पदावर कार्यरत होता. पण आता कृषी अधिकारी म्हणून त्याची निवड झाली होती. कोल्हापूरला कृषी अधिकारी म्हणून जायची त्याची इच्छा होती.मी तेव्हा मंगळवेढा गावात येथे पाटबंधारे विभागात नोकरीला होतो.मित्र आणि मी एकत्र राहत होतो.
मंगळवेढा गावात तेव्हा ज्ञानोबा रामा शिंदे यांच्या नावाचा बोलबाला होता. लोक त्यांना शिंदे मामा म्हणतं.गावात त्यांना मानसन्मान आणि प्रतिष्ठा होती. या शिंदेमामांचे आणि कृषीमंत्री वसंतराव दादा पाटील यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. वसंतराव दादा पाटील जेव्हा जेव्हा या भागात येत तेव्हा मामांची भेट घेत. मामा त्यांना प्रेमाने वसंता म्हणत. मामा तेव्हा कोणाचेही काम निघाले की दादांना जाऊन भेटत. दादा त्यांना म्हणतं, “मामा तुझी बोटभर चिट्ठी सुद्धा माझ्यासाठी लाखमोलाची आहे.”
शिंदे मामा आणि वसंतदादा यांच्यातील ऋणानुबंधाचे कारण म्हणजे,ज्यावेळी स्वातंत्र्य चळवळ सुरु होती. तेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात कारवाया करून वसंतराव दादा पाटील भूमिगत झालेले.त्यांना पकडून देणाऱ्यांना ब्रिटिश सरकारने मोठे बक्षीस लावले होते. त्याचकाळात शिंदेमामाच्या घरी घरगडी बनून वसंतराव दादा विश्वासाने मंगळवेढ्याला राहत होते.अठरा महिने दादानी शिंदेमामाच्या घरी सालगड्याचे काम केले होते हा इतिहास मंगळवेढ्यातील समकालीन लोकांना ज्ञात होता.शिंदेमामांनी बक्षीसाच्या कोणत्याही मोहाला बळी न पडता दादांच्यासारख्या क्रांतीविराला मोठी जोखीम पत्करून सांभाळले होते. त्यामुळे शिंदे मामा याचे स्थान दादांच्या हृदयात होते..
माझ्या मित्राचे काम वसंतराव दादा यांच्या हातून होईल म्हणून आम्ही शिंदे मामांच्याकडे गेलो. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. योगायोग असा की दुसऱ्या दिवशी पंढरपूरला मुख्यमंत्री दादा दौऱ्यावर होते. आषाढी एकादशी होती.आम्ही भाड्याची जीपगाडी घेऊन मामांना सोबत घेऊन पंढरपूरला गेलो. गेस्ट हाऊसला दादा थांबले होते. तुफान गर्दी होती. बाहेर पोलीस आणि आत अधिकारी यांची लगभग होती.आम्ही तिथल्या सुरक्षा रक्षकाना सांगितले.’दादांना भेटायचे आहे. चिठी पाठवली. मामा एका ठिकाणी बसलेले. ते सारखं विचारत होते.
“काय झालं पोरानू?, आम्ही त्यांना सांगायचो.अजून आपल्याला आत बोलवत नाहीत. बराच वेळ बसूनही आपला नंबर येत नाही हे पाहून मामांच्यातील रांगडा माणूस जागा झाला. त्यांनी जोरात,”वसंता हैय वसंता है “अशी हाळी मारली. ती हाळी आत वसंतराव दादांना ऐकू गेली. ऐकताक्षणीच दादा बाहेर आले. त्यांनी मामांना बघताच,”मामा इथं का बसलाय?”असं म्हणत ते मामांच्या पाया पडले. आणि आम्हाला घेऊन ते आत गेले..
“वसंता, हे तूझ्या जिल्ह्यातल पोरग हाय. हे काय म्हणतंय बघ आणि तस कर..” मग माझ्या मित्राने त्याचा आजवरचा प्रवास, प्रतिकूल परिस्थितीत त्याने मिळवलेले यश, या गोष्टी दादांना सांगितल्या. मग दादांनी त्यांच्या सचिवांना बोलावून तात्काळ त्याची नेमणूक कोल्हापूर कृषी अधिकारी म्हणून करायला सांगितली.तेव्हा मोबाईल, इमेल,फॅक्स नव्हते,फोन नव्हते. सचिवांनी डी एस पी यांच्याकडून पोलीस वायरलेस माध्यमातून मुंबईला आणि कोल्हापूरला मंत्रीमहोदय यांच्या आदेशानुसार…. यांना कोल्हापूर जिल्हा कृषी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे असा निरोप दिला.
मग दादा म्हणाले, “मामा ह्या पोराचं काम केलय. तुम्ही जेवण करा आता.” मी संध्याकाळी जेवत नाही . ही पोर जेवत्याली.’ मग आम्ही दोघानी जेवण केलं. मामासोबत बाहेर आलो. दादा मामांना सोडायला बाहेर आले.
“पोरांनो मामांना नीट घेऊन जावा..” गाडी निघाली… दुसऱ्या दिवशी पहाटे कोणीतरी येऊन आमचा दरवाजा ठोठावत होते.उठलो तर दारात पोलीस.त्यांनी माझ्या मित्राचे नाव घेत हे इथंच राहतात काय?असं विचारलं.आम्ही होय म्हणताच ‘तुम्ही कोल्हापूरला कृषी अधिकारी म्हणून हजर व्हा असा वायरलेस मेसेज आला आहे.
सकाळी साडेनऊ वाजता कोल्हापूर-सोलापूर ही गाडी होती. त्या गाडीने आमचा मित्र कोल्हापूरला जायला निघाला जाताना शिंदे मामांना भेटायला गेलो. त्यांना नमस्कार केला. ते म्हणाले,’जावा. चांगलं काम करा.”त्यांनाही आनंद झालेला. पुन्हा म्हणाले, “एसटीत जागा मिळते का बघ नाहीतर वसंताच नाव सांग..”मामाचा तो भाबडेपणा आणि वसंता या नावावरचा अढळ विश्वास हे पाहून आम्हीही भारावून गेलो… गरीब घरातील हा माझा मित्र कोल्हापूरला जिल्हा कृषी अधिकारी झाला. कमवा आणि शिका मधून ज्या खात्यात शिपाई म्हणून काम केले होते. त्याच ऑफिसात तो साहेब झाला होता..
वसंतराव दादांचा हा एक प्रसंग मला नेहमी आठवतो. सामान्य माणसाच्या आयुष्यात वसंत फुलवणाऱ्या दादांची आज जयंती. विन्रम अभिवादन… आणि दादांच्यातील असामान्यत्वाचे दर्शन घडवून आणणाऱ्या आमच्या शिंदेमामा यांनाही अभिवादन..!
- सुनिलकुमार मुसळे विशेष कार्य अधिकारी
- ना. अजितदादा पवार
- उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य