
मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यांनंतर देवेंद्र फडणवीस यांना हिंदूहृदयसम्राट सम्राट ही पदवी द्यावी, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याचवेळी नवाब मलिक हे ईडीने अटक केल्यानंतर हातवारे करत होते; तिथे पोलिसांऐवजी आम्ही असतो तर कानाखाली लगावली असती असेही विधान त्यांनी केले आहे.
चेंबूरमध्ये वार्ड कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आपण आभार मानायला हवेत. जर बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदूहृदयसम्राट ही पदवी कोणाला द्यायची असेल, तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यायला पाहिजे, असे मत नितेश राणे यांनी व्यक्त केले.
१९९३ बॉम्बस्फोटांमध्ये अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली. यासाठी आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा मागत आहोत. परंतु पवार साहेब दाऊदशी संबंध असलेल्यांचा राजीनामा का घेत नाहीत? अनिल देशमुख मराठी आहेत म्हणून राजीनामा घेतला का? आणि नवाब मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा राजीनामा घेत नाहीत? अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, परंतु नवाब मलिक यांच्यावर त्यापेक्षा गंभीर आरोप आहेत. पवार साहेबांनी त्यांचा का राजीनामा घेऊ नये? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर हातवारे करत होते. पोलिसांना जर थोडेसे बाजूला ठेवलं असतं तर आम्ही त्यांच्या कानाखाली मारली असती, असं खळबळजनक वक्तव्यही नितेश राणे यांनी केले आहे.