Site icon Aapli Baramati News

BREAKING NEWS : नागपूर अधिवेशन : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार : अजितदादांनी दिली माहिती

ह्याचा प्रसार करा

नागपूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सरकारच्या वतीने आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. सध्याच्या सरकारकडून समाधानकारक काम होत नाही. उलट राज्यात अनेक विषय समोर आले आहेत. सरकारच्या चहापानाला जावे अशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे या सरकारच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जाहीर केले.

महाविकास आघाडीतील घटक पक्षांची आणि प्रमुख नेत्यांची आज अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आल्याची माहिती दिली. सध्याच्या सरकारकडून समाधानकारक असे निर्णय होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या चहापानाला जावे अशी परिस्थिती राहिलेली नसल्याचे अजित पवार यांनी नमूद केले.

राज्यातील समस्या सोडवण्याबाबत या अधिवेशनात दोन्ही बाजूंनी चर्चा व्हायला हवी असे सांगतानाच हे अधिवेशन किमान तीन आठवडे घ्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली.  राज्यात अनेक प्रश्न उभे आहेत. वाचाळवीरांमुळे राज्यातील वातावरण गढूळ झालेले आहे. अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. सरकार सातत्याने कर्ज काढण्यावर भर देत आहे. राज्यातील अनेक प्रकल्प पराराज्यात जात आहेत. मात्र तरीही सरकार शांतच असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version