औरंगाबाद : प्रतिनिधी
पन्नास खोक्यांवरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ घसरली. अब्दुल सत्तार यांनी अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी सत्तार यांच्याविरोधात निदर्शने होत आहेत.
आज औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तार यांना माध्यम प्रतिनिधींनी पन्नास खोक्यांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्या टिकेबद्दल विचारलं.. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत अतिशय अपमानास्पद शब्द वापरले.
अब्दुल सत्तार यांच्या या टिकेनंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात आली. तर काही ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत.
मागील काही दिवसांत शिंदे गटातील आमदार व नेत्यांकडून अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अतिशय अपमानास्पद भाषेत टिका केल्यानं नव्या वादाला तोंड फुटले आहे.