आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BREAKING NEWS : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीलाच सर्वाधिक यश : शरद पवार

राजकारण
ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात नुकताच ५४७ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे व भाजप गटाकडून मोठं यश मिळाल्याचा दावा केला जातोय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत निकालाची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला सर्वाधिक यश मिळाला असल्याचा दावा केला आहे . महाविकास आघाडीने एकूण २७७ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला २१० ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

पत्राचाळ घोटाळ्यावरुन सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांबाबतही शरद पवार यांनी यावेळी स्पष्टीकरण दिले. “पत्राचाळी संदर्भात जी काही बैठक झाली त्याचा तपशील सर्व नमूद आहे. तत्कालीन सचिवांची त्यावर सही आहे आणि त्याचा इतिवृतांत सर्वांना देत आहे. तरीही काही चौकशी करायची असेल तर ती लवकरात लवकर करा आणि सगळं खोटं ठरलं तर मग संबंधित आरोप करणारांबद्दल काय भूमिका घेणार ? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ही शरद पवारांच्या प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील,अशी खोचक टीका करत शरद पवार यांना लक्ष्य केले होते. याबाबत विचारण्यात आलं असता शरद पवार यांनी थेट राज ठाकरेंवर निशाणा साधला. हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले लोक विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय बोलायचं? अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरेंवर खोचक टोला लगावला.

भाजपच्या मिशन बारामती बद्दल शरद पवारांना विचारणा करण्यात आली असता ‘देशात आता भाजपाला अनुकूल वातावरण राहिलेलं नाही. नागरिकांमध्ये खूप असंतोष आहे. याची कल्पना भाजपाला आहे त्यामुळेच देशात विविध लोकसभा मतदार संघांची जबाबदारी पक्षाच्या नेत्यांना निश्चित करुन दिली जात आहे’ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us