
मुंबई : प्रतिनिधी
ओबीसी आरक्षणाचा विषय प्रलंबित असल्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. अशातच आता पावसाळ्यात निवडणुका घेणं शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिले आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतरच राज्यातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्र दिले आहे. पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नसल्याचे या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबत आता ४ मे रोजी सुनावणी होणार आहे. पावसाळ्यात राज्यातील वादळी वारा आणि पाऊस लक्षात घेता कोणतीही निवडणूक घेता येणार नसल्याचे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.
निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यातील 18 महापालिकांच्या निवडणुका सध्या रखडल्या आहेत. राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा पारित या निवडणुकांचे सर्व अधिकार निवडणूक आयोगाकडून काढून घेत स्वत:कडे घेतले आहेत.