मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता कॉँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. कॉँग्रेसचे वरिष्ठ नेते आता मुंबईत दाखल झाले असून राज्यातील आमदारांना मुंबईत बोलावून घेतले आहे. कोणताही दगा होवू नये यासाठी या आमदारांचे मुंबईत पोहोचेपर्यंत लोकेशन ट्रेस केले जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी आज समर्थक आमदारांसह बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. शिंदे हे आमदारांसह सुरतमध्ये थांबले असून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आता कॉँग्रेसने सावध भूमिका घेतली आहे.
राज्यातील कॉँग्रेस आमदारांना मुंबईत बोलावण्यात आले आहे. सध्याच्या बंडाच्या खेळीत दगाफटका होऊ नये यासाठी कॉँग्रेसकडून दक्षता घेतली जात आहे. त्यामुळे या सर्व आमदारांचे मुंबईत पोहोचेपर्यंत लोकेशन ट्रेस केले जाणार आहे. दरम्यान, सर्व आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले जाणार असून या दरम्यान विधानपरिषद निवडणुकीतील पराभवावर चिंतनही केले जाणार आहे. दुसरीकडे भाजपनेही आमदारांना अन्य राज्यात हलवण्याची तयारी चालवली आहे.