नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः राष्ट्रवादीसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. आज सायंकाळी निवडणूक आयोगाकडून याबाबत घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेससह सीपीआय या पक्षाचाही राष्ट्रीय दर्जा रद्द करण्यात आला आहे.
२००० साली राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला होता. २०१४ नंतर झालेल्या सलग दोन लोकसभा निवडणुका आणि २०१९ नंतरच्या २१ पैकी १२ राज्यातील निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पक्षाचा राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. राष्ट्रवादीबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि सीपीआय पक्षाचाही दर्जा रद्द करण्यात आला आहे.
चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये किमान सहा टक्के मते किंवा लोकसभा निवडणुकीत तीनपेक्षा अधिक राज्यामध्ये किमान दोन टक्के मते असल्यास राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात येतो. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यास देशभरात एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येते. तसेच दिल्लीतही पक्ष कार्यालयासाठी जागा दिली जाते. त्याचबरोबर दूरदर्शन अथवा अन्य वाहिन्यांवर प्रसारणासाठी वेळ मिळतो. मात्र हा दर्जा नसेल तर या सर्व सुविधांपासून वंचित राहावे लागते.
आज निवडणूक आयोगाने निर्णय जाहीर करताना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे नियम लागू केले आहेत. सोबतच ज्या-ज्या राज्यात निवडणुका झाल्या तेथील आकडेवारी लक्षात घेऊन राष्ट्रीय दर्जा रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.