Site icon Aapli Baramati News

मोठी बातमी : …तर बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार : महादेव जानकर

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. लवकरच निर्मला सीतारामन बारामतीचा दौरा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने  संधी दिल्यास आगामी लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवण्याची इच्छा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघात विशेष लक्ष दिले आहे. खा. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली असून निवडणुकीच्या अनुषंगाने त्या बारामती मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. अशातच महादेव जानकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

जानकर म्हणाले, गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीची तयारी केवळ आठ दिवस अगोदर केली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचा अवघ्या काही हजार मतांनी झाला होता. त्यावेळी मी एक- दोन महिने अगोदर तयार केली असती तर नक्कीच आम्ही जिंकलो असतो, असे महादेव जानकर यांनी सांगितले.

तुम्ही महायुतीमध्ये आहात, बारामती लोकसभेची जागा रासपकडे सोडण्याची भाजपाकडे मागणी करणार आहात का? विचारले असता महादेव जानकर म्हणाले, जर महायुतीचा विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्याची आमची इच्छा आहे. भाजपाने यासाठी समर्थन दिले तर आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version