
बारामती : प्रतिनिधी
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे आणि उपाध्यक्ष सागर जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर नव्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड शनिवार दि. २३ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे या पदावर कुणाला संधी देतात याकडे इच्छुकांसह सभासदांचे लक्ष लागले आहे.
माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष सागर जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नव्याने अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. यामध्ये योगेश जगताप, केशवराव जगताप, मदन देवकाते, सुरेश खलाटे आणि नितीन सातव यांच्या नावाची चर्चा आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली असून आपल्यालाच अध्यक्षपद मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रह धरला आहे.
दरम्यानच्या काळात, योगेश जगताप यांना अध्यक्षपदाची संधी द्यावी या मागणीसाठी पणदरे पंचक्रोशीतील पदाधिकारी, सरपंच आणि युवा कार्यकर्त्यांनी थेट मुंबई गाठत अजितदादांची भेट घेतली. अजितदादांनीही या सर्वांचे म्हणणे ऐकून घेत लवकरच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी केशवराव जगताप यांच्यासाठीही एका शिष्टमंडळाने मुंबईत ना. अजित पवार यांची भेट घेत आग्रही मागणी केली. मदनराव देवकाते यांच्याकडूनही अध्यक्षपदासाठी अजितदादांकडे आग्रह धरण्यात आला आहे.
या संचालकांना मिळू शकते संधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तावरे आडनाव वगळता अन्य संचालकाला संधी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता कोणाचे पारडे जड ठरते हे उद्याच्या निवडीत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, साखर उद्योगासमोर येणाऱ्या काळात काही आव्हाने उभी ठाकली आहेत. या आव्हानांच्या काळात साखर कारखाना योग्य पद्धतीने चालवून सभासदांनाही चांगला दिला पाहिजे. तसेच आगामी काळात ऊस मिळवण्यासाठी चांगलीच स्पर्धा निर्माण होणार आहे. अशा परिस्थितीत अध्यक्ष व संचालक मंडळाला कसरत करावी लागणार आहे. अशात सर्वत्र चांगला जनसंपर्क आणि कारखान्यासाठी धावपळ करण्याची क्षमता असणाऱ्या संचालकाची निवड होऊ शकते असं जानकारांकडून बोलले जात आहे.