
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला असून पहिल्या टप्प्यात शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ अशा १८ मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या संजय राठोड यांनीही शपथ घेतली आहे. संजय राठोडांच्या शपथविधीवर भाजपच्या चित्रा वाघ यांनी टीका करत पूजा चव्हाण प्रकरणातील माझा त्यांच्याविरूद्धचा लढा चालूच राहील असं ट्विट केलं आहे.
‘पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे, जितेंगे’ असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विविध आरोप करण्यात आले आहेत. पूजा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांना परत मंत्रिपद मिळालं आहे. पण त्यांच्याविरूद्धचा लढा अजूनही कायम राहील असा पवित्रा चित्रा वाघ यांनी घेतला आहे.