Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : राज्यात राजकीय घडामोडींना वेग : जयंत पाटील कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार; रोहित पवारांमुळे जयंत पाटील पक्ष सोडण्याच्या तयारीत..?

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी  

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपलेला असतानाच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केला आहे. तर जयंत पाटील यांच्यासह अनेकजण आमदार रोहित पवार यांच्या मनमानीमुळे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात दि. १० जून रोजी शरद पवार गटातील अनेकांचा प्रवेश होणार असल्याची माहिती युवकाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिली आहे. त्याचवेळी त्यांनी जयंत पाटील हे कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावाही केला आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटीसाठी जयंत पाटील यांनी वेळ मागितला आहे. त्यानंतर ते कॉँग्रेसमध्ये प्रवेश करतील असे सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे शरद पवार गटात आमदार रोहित पवार यांची मनमानी आणि हुकुमशाही सुरू आहे. त्यामुळे अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत असून जयंत पाटील हे रोहित पवारांच्या नेतृत्वात काम करू शकणार नाहीत. त्यासाठीच त्यांनी अन्य पक्षात जाण्यासाठी चाचपणी सुरू केली असल्याचा दावा शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. रोहित पवार आणि सुप्रिया सुळेंमुळे शरद पवार यांच्या गटाची अवस्था उद्धव ठाकरे गटाप्रमानेच झाली असल्याचेही शिरसाट यांनी नमूद केले.

भाजपचे प्रवीण दरेकर यांनीही सुरज चव्हाण यांच्या दाव्यात सत्यता असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीपूर्वीच जयंत पाटील कॉँग्रेस किंवा भाजपमध्ये जातील अशी चर्चा होती. त्यांना शरद पवार गटात राहून आपले भविष्य काय असेल याची कल्पना आहे. त्यामुळे ते कोणत्याही क्षणी पक्ष बदलण्याचा निर्णय घेऊ शकतात असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे.

एकूणच लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल अशी शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच दावे-प्रतिदावे होऊ लागल्याने राज्यातील राजकारण आतापासूनच तापले असल्याचे चित्र आहे. निवडणूक निकालानंतर अनेक मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत यामुळे मिळू लागले आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version