मुंबई : प्रतिनिधी
सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून दोन्ही बाजूंकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कारागृहात असलेले मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभेच्या मतदानासाठी परवानगी मागितली आहे. त्यांच्या या अर्जावर ८ जून रोजी सुनावणी होणार असून तत्पूर्वी ईडीने याबाबत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
राज्यात सध्या राज्यसभा निवडणुकीने वातावरण तापलं आहे. १० जून रोजी होत असलेल्या या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी मतदानासाठी परवानगी मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या दोघांच्या अर्जावर ईडीने ७ जून रोजीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. तर याबाबत ८ जून रोजी सुनावणी होणार असल्याचेही न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यसभेसाठी सात उमेदवार रिंगणात असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपकडून मतांची जुळवाजुळव सुरू आहे. प्रत्येक मत महत्वाचे असल्यामुळे आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मतदानासाठी न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यामुळे आता या दोघांना मंतदानाची परवानगी मिळणार का याकडेच लक्ष लागून राहिले आहे.