Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : माझे सासरे शिंदेच… शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी 

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर सातत्याने सत्ताधारी आणि विरोधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तर शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका मंचावर दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणूक आणि बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘डिनर प्लॅन’च्या चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येस आयोजित स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व सदस्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित होते. तसेच आशिष शेलार, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, अमोल काळे, प्रताप सरनाईक हेदेखील उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी, फडणवीस आणि पवार एकत्र आल्यानं काहींची झोप उडू शकते.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मात्र, या डिनरबाबत दोन्ही बाजूंनी राजकारणापासून दूर असल्याची चर्चा आहे. 

तसेच, “मला आणि फडणविसांना थोडी थोडी बॅटिंग करता येते. तीन महिन्यांपूर्वी आम्ही दोघांनी मिळून बॅटिंग केली. त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादानं मॅच जिंकली. काहींचे मनापासून आशीर्वाद होते. पवार साहेबांचा जन्म साताऱ्याचा आहे. माझा जन्मही साताऱ्याचा आहे. पवार साहेबांनी जे सांगितलं आहे, ते आम्हाला करावंच लागेल. पवार साहेब आपण जे म्हणालात, त्याने आम्हाला आनंद झाला आहे. देवेंद्रजींनाही आनंद झाला आहे,”असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

त्याचवेळी बोलताना शरद पवारांनी अनेकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे हातवारे केले. पण सध्या चर्चेत आहे, ती म्हणजे, पवार-शिंदे सोयरिकीची. यावेळी बोलताना पवार म्हणाले,”माझे सासरे शिंदेच… आणि शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंना आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्यानं विचार करावा, अशी विनंती करतो.” पवारांच्या या विधानानंतर उपस्थित असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांमध्ये हसा पिकला. 

दरम्यान, मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएच्या निवडणुका आज (गुरूवारी)20 ऑक्टोबरला होणार आहेत. या निवडणुकांमध्ये शरद पवार आणि आशिष शेलार यांचं पॅनल रिंगणात उतरलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असुन पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version