अहमदनगर : प्रतिनिधी
सत्ता येते आणि जातही असते. कुणीही सत्तेचं ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळं आता नव्याने आलेलं सरकार किती दिवस चालेल हे सांगता येत नाही अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. त्याचवेळी राज्यात सध्या पावसाने थैमान घातलेले असताना मंत्रीमंडळ विस्तार, पालकमंत्री नेमणूक, सचिवांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत, हे सरकारचं अपयश असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज अहमदनगर जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात अकोले येथील सभेत बोलताना अजित पवार यांनी शिंदे सरकारवर तोफ डागली. नवीन सरकार सत्तेत आलं आहे. मात्र अद्याप मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नाही. सगळीकडे पावसाचा धुमाकूळ सुरू असताना दोघेच राज्य चालवत असून जिल्ह्यात पालकमंत्र्यांची गरज असताना कोणीही त्याकडे लक्ष देत नाही ही बाब दुर्दैवी असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मंत्रीमंडळ विस्तार करायला कुणी अडवलंय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सरकारच्या मंत्रीमंडळाचा पत्ता नाही. आताच कुणी माईक ओढतंय, तर कुणी चिठ्ठ्या देतंय, या सरकारमध्ये कुणालाच कुणाचा मेळ दिसेना. त्यामुळं हे सरकार किती दिवस चालेल याबाबत शंका असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.