मुंबई : प्रतिनिधी
मागील वर्षापेक्षा अधिक काळ रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड आणखी लांबणीवर पडली आहे. महाविकास आघाडीने १६ मार्च रोजी अध्यक्ष निवड करण्याबाबत दिलेला प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फेटाळून लावला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा कार्यक्रम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. मात्र आज राज्यपालांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवड होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. अध्यक्ष निवडीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे आपण प्रस्ताव मान्य करू शकत नाही असे राज्यपालांनी कळवले आहे.
विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पद्धतीवरून भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाने महाजन यांना १० लाख रुपये दंड ठोठावला होता. या निर्णयाविरोधात महाजन यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अध्यक्ष निवड करता येणार नसल्याचे कारण देत राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रस्ताव फेटाळला आहे.
s