आपली बारामती न्युज - बारामती व परिसरातील बातम्या देणार हक्काचे व्यासपीठ !
राजकारण

BIG NEWS : अनावश्यक वक्तव्ये करून वाद निर्माण करू नका; राज्यपालांच्या विधानावर अजितदादांची ‘रोखठोक’ प्रतिक्रिया..!

राजकारण
ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राज्यपालांकडून वारंवार वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्यावरून अजितदादांनी थेट पंतप्रधानांसमोर कान टोचले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजितदादांनी रोखठोक शब्दात राज्यपालांच्या व्यक्तव्याचा समाचार घेतला आहे. सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची या महाराष्ट्राची संस्कृती असून महामहीम राज्यपालांनी अनावश्यक वक्तव्ये करून वाद निर्माण करून नयेत असा घणाघात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे.

मुंबईतून गुजराती, राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं. त्यावर आता सर्वच पक्षातील नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून राज्यपालांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

यापूर्वी राज्यपालांनी महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अजित पवार यांनी थेट पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात जाहीरपणे कान टोचले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजितदादांनी राज्यपालांच्या वक्तव्यावर शरसंधान साधले आहे. ट्विटरवर अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मुंबई, ठाण्यासह अखंड महाराष्ट्र मराठी माणसांनी घडवला आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आहे. महाराष्ट्र एकसंध, एकजूट आहे. महामहीम राज्यपाल महोदयांनी अनावश्यक वक्तव्ये टाळावीत. महाराष्ट्रात वाद निर्माण करू नये. ।। महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले हे लक्षात ठेवावे… खरा वीर वैरी पराधीनतेचा । महाराष्ट्र आधार या राष्ट्राचा ।।’


ह्याचा प्रसार करा
राजकारण
Back to top button
Contact Us