नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळतच चालला आहे. याचे पडसाद लोकसभेतही उमटले आहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाप्रकरणी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मागील काही दिवसांपासून भाजपशासित राज्याकडून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला आहे.
आजपासून लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर संसदेत प्रश्न उपस्थित केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या दहा दिवसांपासून एक नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या शेजारील कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या बाबतीत प्रक्षोभक वक्तव्य करत आहेत. महाराष्ट्र तोडण्याच्या बाबतीत कर्नाटकचे मुख्यमंत्री वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
काल तर हद्दच झाली. कर्नाटकामध्ये महाराष्ट्रातील लोकांना मारहाण करण्यात आली. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे. भारत हा एक देश आहेत. त्यामुळे देशात हे चालणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विनंती आहे की, त्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.