बारामती : प्रतिनिधी
डोक्यावर टोपी, कपाळी टिळा अशा अनोख्या अंदाजात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी आज पहाटे साडेचार वाजता संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात काकड आरतीला हजेरी लावली. यावेळी पार्थ पवार यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना अभिषेकही घालण्यात आला.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा काल सायंकाळी बारामती मुक्कामी दाखल झाला. बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर पालखी भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली. आज पहाटे साडेचार वाजता युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला. तसेच काकड आरतीही करण्यात आली. यावेळी बारामतीच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, मुख्याधिकारी महेश रोकडे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे, उद्योजक वैभव तावरे आदी मान्यवर उपस्थित होते.
आज नेहमीप्रमाणे काकड आरती होवून पालखी मार्गस्थ होईल असा अंदाज होता. मात्र अचानकपणे पार्थ पवार यांनी आरातीसाठी हजेरी लावत भाविकांना आश्चर्याचा धक्का दिला. त्याचवेळी पार्थ पवार यांनी उपस्थित वारकरी आणि भाविकांची भेट घेत आस्थेवाईकपणे विचारपूसही केली. त्यामुळं पार्थ पवार यांच्या आजच्या उपस्थितीची चांगलीच चर्चा रंगली.