Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : ‘नॉट रिचेबल’च्या अफवेवरून अजितदादा स्पष्टच बोलले; चुकीच्या बातम्या देऊन विनाकारण बदनामी करू नका..!

ह्याचा प्रसार करा

पुणे : प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून तब्बेत बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो, अशी माहिती देत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे माझी विनाकारण बदनामी झाल्याची नाराजी व्यक्त करत यापुढे माध्यमांनी खात्री करुनच बातम्या दाखवण्याची सूचना माध्यमांना केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, काल शुक्रवारी पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकुल परिणाम माझ्या तब्बेतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवासस्थानी विश्रांती घेतली.

मी घरी विश्रांती करत असताना ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता एखाद्याची किती बदनामी करायची याला काही मर्यादा असतात. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्या विषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांनी खात्री करुनच यापुढे बातम्या चालविण्याची सूचना माध्यमांना केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version