Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : राष्ट्रवादीतील निवडींवरुन अजित पवार नाराज ही केवळ अफवा : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया

ह्याचा प्रसार करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या माध्यमातून देण्यात आल्या. त्यावर आता शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पक्षातील या निर्णयाबद्दल आम्ही सर्वांशी चर्चा केली आहे. मात्र त्यातून लगेच अजित पवार आणि जयंत पाटील हे नाराज असल्याच्या बातम्या चालवल्या गेल्या. वास्तवात या केवळ अफवा असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

आज दिल्लीत शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या नाराजीबद्दलही त्यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात अजित पवार हे प्रमुख नेते म्हणून आणि राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. तर जयंत पाटील यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. आजच्या निवडीबद्दल सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

नवीन निवडी करताना संघटना अधिक मजबूत करण्यावर संबंधितांना भर द्यावा लागणार आहे. ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर महिन्यात किमान चार दिवस संबंधित राज्यांसह दिल्लीत वेळ देण्याबाबतही सूचना देण्यात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version