Site icon Aapli Baramati News

राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; नवाब मलिक यांच्याकडील विभागांची ‘या’ मंत्र्यांकडे सोपवली जबाबदारी

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून त्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची वेळोवेळी मागणी होत होती. काल रात्री उशिरा शरद पवार यांच्या मुंबईतील ‘ सिल्वर ओक’ या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत नवाब मलिक यांच्याकडील मंत्रीपदाचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

नवाब मलिक यांच्याकडील अल्पसंख्याक मंत्रीपद गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आले आहे.तर कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे सोपवली आहे. तसेच नवाब मलिक यांच्याकडे गोंदिया आणि परभणी या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती.

परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवली आहे. तर गोंदिया या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे देण्यात आली आहे.नवाब मलिक यांच्याकडे असलेल्या मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीही पर्याय निवडण्यात आला आहे.

सद्यस्थितीत कामकाज पाहण्यासाठी दोन कार्याध्यक्षांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यानुसार कार्याध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. आगामी महानगरपालिका निवडणूक लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला आहे. 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version